स्नान करतांना सर्वलोक आपापली पापे गंगेत सोडतात. वासनेच्या वस्त्रासह सचैल स्नान होते. त्या सर्वांच्या पातकाचा बोजा गंगेला असह्य होतो व गंगा भगवंताला म्हणते, प्रभु मी हे सर्वांचे पाप कुठे टाकू?
भगवान म्हणाले....
संत जेव्हा तुझ्यात स्नान करतील तेव्हा तुझी सर्व पापे त्यांच्या ज्ञानाग्नीत भस्म होतील. गंगेला निष्पाप करण्यासाठी संत तीर्थस्नाने करतात. तीर्थांना तीर्थत्व संतामुळे येते. जे जे ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहे, शुर्चिभूत आहे, वंद्य आहे ते ते तीर्थरूप होते. संत ह्दस्थ भगवत्सान्निण्याने तीर्थाचे तिर्थिकरणात भर टाकतात. भगवंताचे चरणतीर्थ गंगा आहे. लीलातीर्थ यमुना आहे व ह्दय तीर्थ सरस्वती आहे. त्या त्रिवेणीच्या वेणीतला हसरा गजरा गोदावरी आहे. त्र्यंबकेश्वर गोदेचे मुळ आहे. जन्मस्थान आहे. तिचा चक्रतीर्थावर जात कर्म संस्कार झाला व नंतर नाशिकला निक्रमण झाले. गंगापूरला उपनयन झाले. नंतर ती श्रीराम भेटीसाठी पंचवटीत विसावली. नाशिक घाट आहे. पंचवटी पदर आहे. शुध्द प्रवाहाची साडी नेसून गोदावरी कुशावर्तात उभी आहे. त्र्यंबकेश्वर गोदेचे ॠषिकेश आहे तर नाशिक हरिद्वार आहे, कुशावर्त गंगोत्तरी आहे. तेथून निघालेली ही गंगा जाताजाता छोटया मोठया नदीनाले ओहोळांना पोटात घेऊन शुक्ल रंगाची साडी नेसून नाशिकच्या रामकुंडात प्रवेश करते. वैष्णव संत याच कुंडात सिंहस्थस्नान करून पुण्याचा कुंभ भरतात. परमहंस अवधूत संन्याशाचे माहेर आहे. आदिनाथ भगवान त्र्यंबकराज नाथपंथांच्या अद्धयानंद वैभवाचे प्रधान गुरूपीठ आहे. निवृत्तीनाथ्ा व ज्ञानेश्वर याच गुरूकुलाचे विद्यार्थी!
श्री ज्ञानेश्वर ह्दयाने शाक्ति, शरीराने शैव व सभेमध्ये वैष्णव होते.
भागवत धर्माचा हरिपाठ ज्ञानेश्वरांनी लिहिला.
पंढरपूरची वारी हे उपनयन आहे. हरिपाठ ही संध्या आहे तर ज्ञानेश्वरी हा महाराष्ट्राचा वेद आहे. ज्ञानेश्वरांचे गुरूमंदिर आंळदी आहे. ज्ञानेश्वरांच्या गुरूकृपेने इंद्रायणीत बुडी मारली व इंद्रायणी काठी ज्ञानेश्वरांची समाधी लागली. त्यांच्या संजीवनाची अमृतधारा म्हणजे गोदावरी ।। जीवनमुक्त ज्ञानेश्वरांचे विदेह मुक्त गुरू निवृत्तीनाथांनी गंगासागरात जलसमाधी घेतली असे हे ज्ञानेश्वरांचे विद्यातीर्थ व गुरूतीर्थ त्र्यंबकेश्वर. ज्ञानेश्वरांची उपदेशाची अमृतधाराच गोदावरीतून वाहत आहे..