सिंहस्थ कुठे ? त्र्यंबकेश्वरला की नाशिकला ?
अश्या कृत्रिम कलहात बुडालेल्या कलह पंडितांना गंगा म्हणते,
तुम्ही काठावर का भांडता ? तुम्ही स्नान करा.
मनातल्या तू-तू-मी-मी चे माझ्यात विसर्जन करा. देह आणि मनशुध्दी झाली की गंगाच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल. उत्तरक्रिया घाटावर व भांडण काठावर ! काठावर पास होणारे भांडतात. ज्ञानगंगेच्या मुळाकडे जाणारे कलहमुक्त होतात. कलहकडूंचे अस्थिविसर्जन झाले की तुमच्या शंकेला चिरशांती मिळेल.
त्र्यंबकेश्वरला आलात की प्रश्न कैलासवासी होतील व शंका वैकुंठवासी होतील.
कलह म्हणजे विचार सूर्यावरचे पांढरे ढग. या ढगात पाणी नसते. हे ढग तहान भागवित नाहीत. ज्ञानाची भूक भागवीत नाहीत. प्रेमाची तहान व ज्ञानाची भूक भागवणारी ज्ञानगंगा आहे. तीच गोदावरी आहे. कलहशांतीसाठी सिंहस्थस्नान आहे. कलहाची लागण तर सर्वत्र असते. साधूसंतही भांडतात. फार पूर्वी शैव-वैष्णव सांधूची स्नाने कुशावर्तात एकत्र होत असत. कुणाचे स्नान आधी व नंतर या स्नानाक्रमावरून चकमक उडाली. लाठया-काठया, भाले-बरच्या, त्रिशूल-तलवारी शांतीच्या म्यानातून बाहेर आल्या. विरक्त रक्ताची रंगपंचमी खेळले. मग वैष्णवांनी नाशिकला स्नान करावे व शैवांनी त्र्यंबकला असा निर्णय झाला. सर्व सांधूचे आखाडे त्र्यंबकेश्वरीच आहेत. सिंहस्थाच्या शाहीस्नानाचा मान कुशावर्ताला मिळाला. कुशावर्त तीर्थावरच मूळगंगेच्या पवित्र जलाला राजपट्टाभिषेक झाला व कुशावर्ताला तीर्थराज ही पदवी मिळाली. साधूच्या राजेशाही मिरवणुका ही शोभायात्रा आहे. त्यांच्या त्यागाची वैराग्याची अग्रपूजा आहे.