पंचांग समिती नाशिकतफें प्रसिध्द झालेल्या पंचांगावर पंचागमर्ते ज्यो. दाते व ज्यो. सोमणशास्त्री यांचा अभिप्राय
नाशिक येथील पुरोहित संघाने पुरस्कृत केलेल्या स्थानिक ज्योतिषमंडळाकडून पंचांगसमिती (नाशिक) तर्फे प्रसिध्द झालेले शके १८७७ चे पंचांग पाहिले. या पंचांगांतील निवेदन आणि प्रस्तावना यावरून असे दिसून येते की या पंचांगांतील तिथी, नक्षत्रे, योग व करण ही अंगे बीजसंस्कृत रवि-चंद्रानुसारी असणें हे धर्मशास्त्राच्या विरुध्द आहे. तसेच केवळ दृक्प्रत्यय हा धर्माविरोधी अतएव अशास्त्रीय आहे असे पंचांगसमितीचें मत दिसते, म्हणून या पंचांगांतील तिथ्यादिकांचे गणित शुध्द ग्रहलाघवानुसार केलेले असून ग्रहणे, युति, अस्तोदय इत्यादिकांचे काल आधुनिक दृक्प्रत्ययानुसारी गणितांने सिंध्द असे दिले आहेत असा, स्पष्ट खुलासा निवेदनात आहे.
पंचांगसमितीच्या या विशिष्ट मतांप्रमाणे म्हटले म्हणजे ग्रहलाघवावरून समितींने तिथ्यादि गणित करणें म्हणजे स्वमताची वंचनाच होय. कारण समितीला तिथ्यादिकांत बीजसंस्कार अशास्त्रीय वाटतो तर ग्रहलाघवांत चंद्राला बीजसंस्कार देऊनच तदनुसार तिथ्यादिसाधन सांगितले आहे. तसेच केवळ दृक्प्रत्यय हा समितीला अशास्त्रीय वाटतो, तर ग्रहलाघवकार स्वत:च्या ग्रंथाविषयी म्हणतात - "इमे यान्ति दृक्तुल्यतां, सिध्दैस्तैरिह पर्व-धर्म-नय-सत्कार्यादिकं त्वादिशेतु ।" म्हणजे ग्रहलाघवाप्रमाणे ग्रहगणित दृक्प्रत्ययतुल्य येते म्हणूनच तदनुसार श्रौतस्मार्तादि कार्याचा कालनिर्णय करावा असे ग्रहलाघवकार म्हणतात! समितीनें आपल्या मत समर्थनार्थ असे वचन दिले आहे की, "श्रौतस्मार्तकर्मानुष्ठानार्थं धर्म - शास्त्राविरुध्दं मूलसिध्दान्तानुसारेण दृग्गणितैयक्यकरणपुरस्सरं पंचांगमुत्पादनीयम्।" पण ग्रहलाघवकारांनीं आपल्या ग्रंथांतील ग्रहमानें मूलसिध्दान्तानुसारीं घेतलीं नाहींत तर प्राचीन सिध्दांतग्रंथांतील मानांत द्दक्प्रत्ययानुसार योग्य वाटला तो भरपूर फरक करुन घेतला. तसेच धर्मशास्त्रांत तर ग्रहमानें नव्हतींच. शेवटी त्यांनी स्वानुभवानें साधलेल्या दृक्प्रत्ययी ग्रहगतिमानांनुसारच धर्मकार्ये करण्याचा आदेश दिला. केवळ नाशिकच्या प्रस्तुत पंचांगांवर न विश्वासतां मूळ ग्रहलाघव ग्रंथ जो पाहील त्याला हे सहज समजून येईल की, समितीच्या मतांशीं ग्रहलाघवांची मतें काडीमात्रहि जुळणारीं नाहींत, आणि म्हणून समितींने ग्रहलाघवावरून पंचांग-गणित करण्यात आपल्या अनुयायांची सर्वस्वी फसवणूक केली आहे, म्हणजे या पंचांगांत दृक्तुल्यता नाही आणि समितीचे हेतु देखील मुळीच सापडले नाहींत म्हणून हे पंचांग निरूपयोगी आहे.
प्रस्तुत पंचांगांतील तिथ्यादि-समाप्तिदर्शक घटी-पळें नाशिक येथील स्पष्ट सूर्योदयापासून किंवा मध्यम सूर्योदयापासून आहेत हे कोठेंच सांगितलेले नाही. मुंबईचे स्थानिक ग्रहलाघवी पंचांग ज्यो. छत्रे करितात त्यातील घटिका-पळांशी प्रस्तुत पंचांगांतील घटीपळे देशभेदाने जमत नाहीत. म्हणजे ज्यो. छत्रे किंवा या पंचांग समितीचे ज्योतिषी यांत कोणीतरी चुकीचे गणित दिले आहे, असे गणिताच्या खटाटोपांत न पडता केवळ या दोन पंचांगांची तुलना करून कोणासही समजेल असेच दुसरे एक ग्रहलाघवी पंचांग शके १८७७ चे नांदेड येथे श्री समर्थदाजी महाराज पंचांग म्हणून प्रसिध्द म्हणून झालेले आहे. ते नांदेडचे स्थानिक गणितांचे आहे. नांदेड व नाशिक यांमध्ये वास्तविक मध्यम रेषांतर ३५ पळांचे आहे हे भूगोल शिकणारी मुलेही सांगू शकतील म्हणजे नांदेड व नाशिक या दोन ठिकाणच्या स्थानिक पंचांगांत सुमारे एवढा किंवा चरसंस्काराच्या फरकामुळे यांत आणखी सुमारे पाच पळे कमी जास्त करून तिथ्यादिकालांतील घटिका-पळांत फरक दिसायला हवा होता. पण नाशिकच्या पंचांगसमितीने नांदेड पंचांगांची नक्कल केली की नांदेड पंचांगांने नाशिकची नक्कल केली, कुणाला ठाऊक! दोघांचेही आकडे अगदी सारखे दिसतात. यावरून या दोघांपैकी कोणातरी एकांने किंवा कदाचित दोघांनीही तिथ्यादिकांचे सारखे आकडे देऊन त्यांच्या धार्मिक जनतेची उघड फसवणूक केली आहे. हे ती दोन पंचांगे पडताळून पाहाता कोणासही समजून येईल. नाशिक शहर हे रेखांतराने मुबंईच्या पूर्वेस आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत नाशिक येथे मुंबईच्या आधी सूर्योदय, माध्यान्ह व्हावयास पाहिजेत, हे शाळेतील विद्यार्थींही सांगतील. पण नाशिकच्या पंचांगकर्त्यांना हे ज्ञान नाही. त्यांच्या पंचांगातील सूर्योदयास्तांचे काल पहा, ते मुंबईपेक्षा कमी असण्याऐवजी सुमारें पाच मिनिटे जास्त उशीरांचेच आहेत. नाशिककरांचा सूर्य पृथ्वीवर उलट दिशेने उगवत जात असावा!! खरोखर नाशिक पंचांगकर्त्यांना ही मोठी लज्जास्पद गोष्ट आहे. ज्यांना स्थानिक सूर्योदयास्त कालसाधन करता येत नाही. त्यांनी धार्मिक कालनिर्णयाच्या आणि पंचांग गणिताच्या कार्याला प्रवृत्त व्हावे, यावरून त्यांच्या पंचांगांतील तिथ्यादि कालनिर्णय व धर्मशास्त्रार्थ यांची काय लायकी आहे ती बिचारी अशा नाशिककरांनी समजावी. आम्हाला हा नाशिकपंचांगाचा अडाणीपणा वर्णन करणे अशक्य आहे.
नाशिक पंचांग समितीच्या या पंचांगातील एकाही दिवसाचे सूर्योदयास्त काल बरोबर नाहीत. ग्रहांचे राश्यंतरकाल पुष्कळ स्थळी ग्रहलाघवानुसार नाहीत. ग्रहगति देखील पुष्कळ स्थळी बरोबर नाहीत. पौष कृष्ण ११ ला बुधाचा पूर्वोदय झाल्यानंतर १५ दिवसांनी मार्गी बुध: असे लिहिलेले आहे हे ग्रहलाघवी गणित आहे काय? प्रस्तुत पचांगांतील अशा कित्येक गणितदोषांची यादी सामान्य पंचांग ज्ञान असणार्या गृहस्थालाही तयार करता येण्याजोगी आहे. विशेष विस्तार करण्याची जरूरी नाही.
प्रस्तुत पंचांगांतील ग्रहणें आधुनिक दृक्प्रत्ययानुसारी गणिताने सिध्द असे दिल्याचे निवेदनात सांगितले आहे, पण त्यातील एकाही ग्रहणाचे स्पर्श: मोक्षकाल दृक्प्रत्ययानुसारी नाहीत. त्यात पंचवीस मिनिटांपर्यंत कमी जास्त फरक आहे. किंबहूना त्यात छापलेल्या ग्रहणांच्या आकृत्या तयार करण्याची तर त्या पंचांग समितीची छातीच नाही. त्या दुसर्यांच्या चोरून घेतलेल्या आहेत हे सिध्द करण्यास फारसा वेळ लागणार नाही. पंचांगसमितीला गणित येत असेल तर हे आव्हान तिनें स्वीकारावे व ग्रहणगणित प्रसिध्द करावे.
हे पंचांग धर्मशास्त्राला हितकर म्हणून सांगितले आहे. पण ज्येष्ठ शुक्ल १२ गुरूवारी दिवसा २१ घटिकानंतर व रात्री परिघयोग पूर्वार्ध आहे आणि तरीही दिवा रात्रौ असा मुहूर्त त्यांत दिला आहे. असे मुहूर्तातही अनेक दोष आहेत. तात्पर्य हे पंचांग ग्रहलाघवांचे केवळ नांव सांगून कोठलेतरी उतारे काढलेले एक खोडसाळ चोपडे आहे. त्यांत ग्रहणादिक माहिती दृक्तुल्य नाही आणि तिथ्यादिमानें ग्रहलाघवी व स्थानिक नाहीत. सूर्योदयास्त बरोबर नसल्यामुळे कोणत्याही कार्याला योग्य मार्गदर्शनही या पंचंगानें होऊ शकणार नाही. नाशिकसारख्या विशाल कीर्तीच्या क्षेत्रात असले नकली पंचांग प्रसिध्द व्हावे हे नाशिक शहरांत ज्योतिषशास्त्राचा पूर्ण अभाव असल्याचेच परिपूर्ण निदर्शन होय.
प्रस्तुत पंचांगांत तिथ्यादिसाघन बीजसंस्काररहित करावे असे सांगितले आहे. पण भौमादि ग्रह कसे घ्यावे हे सांगितले नाही, आणि ते काहीही आधार न दाखविता, खेटयाच गणिताचे दिले आहेत. भौमादिग्रह देखील ग्रहलाघवीच घ्यावे असे वचन त्या पंचांगंसमितीजवळ आहे काय? आणि तसें जर समितीला या पंचांगांत लिहिता आले नाही तर सिंहस्थ गुरूकाल हा अखंड मानावयास सांगण्याचा कोणता अधिकार समितीला पोचतो? ही समितीनें जनतेची फसवणूक केली नाही काय? आमचे तर असे स्पष्ट मत आहे की, सिंहस्थ गुरूकाल हा ग्रहलाघवीप्रमाणे मानणे अशास्त्रीय आहे. तो दृक्प्रत्ययतुल्य गणितानें आल्याप्रमाणेच त्रिखंडच मानला पाहिजे. श्रमिज्जगदगुरू श्री शंकराचार्य मठ शृंगेरी यांचे पंचांगांतही सिंहस्थ त्रिखंडच आहे. तसेच श्रीशंकराचार्य मठ संकेश्वर शिष्यस्वामी (जेरे) यांच्या मठात जे पंचांग वापरले जाते त्यातही सिहस्थ त्रिखंडच आहे. त्यांचे तीन खंड असे आहेत.
प्रथम खंड - १ ऑक्टोंबर १९५५ ते १४ मार्च १९५६ पर्यंत
द्वितीय खंड - २२ मे १९५६ ते २८ ऑक्टोंबर १९५६ पर्यंत
तृतीय खंड - १८ एप्रिल १९५७ ते १९ जून १९५७ पर्यंत
तसेच तिथ्यादि सर्व काल दृक्प्रत्ययरहित घेणे हे अशास्त्रीय आहे. ग्रहलाघवाची परंपरा दृक्तुल्य गणिताची आहे. नाशिककर समजतात तशी ती दृक्प्रत्ययहीन नाही, हे ग्रहलाघव ग्रंथांच्या अभ्यासकांस कळेल. श्रौतस्मार्त कर्मे ही शेकडोवर्षापूर्वीची आहेत. ती काही ग्रहलाघवानंतरची नाहीत. ती कर्मे आचारांत आल्यापासून कित्येक वेळा या भारतात नवीन नवीन निरनिराळे पंचांगगणित ग्रंथ झाले, पण ते सर्व दृक्प्रत्ययसाधनासाठींच झाले. दृक्प्रत्यय जर मानावयाचा नसता, तर पवित्र वेदांगज्योतिषच आचरणांत ठेवायला काय हरकत होती? तात्पर्य नाशिकला जो दृक्प्रत्ययहीनतेचा कैवार घेतात तो भारतीय ज्योतिष परंपरेच्या विरुध्द अतएव खोडसाळ आहे. सर्वांनी सर्व कार्यास दृक्तुल्य ग्रहगणिताचेच काल स्वीकारणे हे सर्वस्वी हितकर आहे. नाशिकचे पंचाग धार्मिक कृत्यास पूर्णपणे निरूपयोगी आहे.
धुंडिराज लक्ष्मण दाते
पंचांगकर्ते, सोलापूर
कृष्णाजी विठ्ठल सोमण
पंचांगकर्ते, मुंबई
ज्येष्ठ शु. १५
रविवार ५/६/१९५५