आचार्य, साधू, महंत व मंडलेश्वर हे धर्मसैनिक आहेत. आद्यशंकराचार्य सम्राट तर मंडलेश्वर हे सामंत आहेत. मांडलिक आहेत. शरीर, मन व वाणीवर ज्यांची दण्डसत्ता ते त्रिदण्डी पदण्डी संन्याशी याचेच हाती धर्मदण्ड असावा. सत्ता, संपत्ती, व भोग यांनी पोखरलेला राजदंड पिचका असतो. धर्मसम्राट आद्यशंकराचार्यांनी धर्मरक्षणासाठी चार मठ स्थापन केले. दसनामी साधू, संन्याशी, संत व मंहत यांना मठानुशासनाखाली एकत्र आणून त्यांना त्या-त्या आखाडयांची सत्ता व प्रभुत्व सोपविले. उन्मत सत्ता, दुर्बल ज्ञान, आंधळा कायदा व चंचल लोकशाही हे चार धर्माचे शत्रु आहेत. हे धर्मदंडानेच वठणीवर येणार! त्यासाठी शस्त्र लागते.
।। शस्त्रेण रक्षिते राष्ट्र शास्त्राचिंता प्रवर्तत ।।
ह्दयात धर्मश्रध्दा व श्रध्देत शास्त्रबळ आणि त्या शास्त्राच्या मुठीत शस्त्र हवे. शस्त्र सुरक्षित राष्ट्रात शास्त्रचिंतन रंगते. ज्ञानवैराग्याची धार असलेले धर्मशास्त्र व धर्मशासनच शत्रुंचा बुध्दिवध करू शकते. विरक्त साधूनांही धर्मासाठी रक्त सांडावे लागते. अवैदिक बौद्धादि धर्मपंथांशी साधूंनी लढा दिला. उघड शत्रू व प्रच्छन्न शत्रूंच्या विळख्यात सापडलेल्या धर्म साधूंनी वाचविला. अधर्माच्या पोलिओने लंगडया झालेल्या इंग्रजांच्या शाळा अधर्मशाळाच होत्या. तेथे होणार्या बुद्धिवधाने हिंदू हतबल झाले. या प्रज्ञापराधाच्या भोवर्यातून कोण वाचविणार? आखाडयातले वेदांतमल्ल साधू धर्मासाठी लढले. वेदांताने धर्मांला धार येते व धारदार धर्मच देशाचा आधार असतो. भारतात त्या-त्या पर्वकाळात भरणार्या कुंभमेळ्यात धर्मचिंतन व ब्रम्हचिंतनासाठी एकत्र येणार्या साधुसंतांची बॅटरी चार्ज होते. पापांचे चेक वाटणारी शिदंळ राजसत्ता धर्मांचे काय रक्षण करणार? राजसत्तेच्या पत्रिकेत भ्रष्टाचाराचा मंगळ असल्यामुळे तिचे धर्माशी लग्न होत नाही. हा भौमदोष घालविण्यासाठी धर्मसार्वभौम साधू स्नानाला येतात. राजस्वला राजनीतीने विटाळलेला धर्मही गंगास्नानाने शुध्द होईल. साधूंचे आखाडे धर्मरक्षणाचे बिल्ले आहेत. रामकृष्ण परमहंसाना समाधियोग शिकविणारे तोतापुरी याच आखाडयातून निर्माण झाले.
विरक्त साधूंच्या नग्न मिरवणुका कशाला?
विदेही संतांची नग्नता, देहातीत अवधूतांची स्थिती असते.
ही शृंगारात बुडालेली कामाधांची अश्लिलता नव्हे.
ही ज्ञानाची, वैराग्याची व अनासक्तीची परीक्षा असते.
पाण्यात राहून कमळ अलिप्तता शिकविते.
भोगातील नग्नता रोग आहे. ज्ञानातील नग्नता योग्य आहे.
संतांच्या विदेहावस्थेचे हे सामाजिक अभिनंदन आहे.
मिरवणुकीत त्या त्या संतांच्या आराध्य देवता व त्यांच्या गुरूदेवांच्याही प्रतिमा असतात. म्हणजे ही देवतेची मिरवणुक असते. देहवस्त्राचे गंगेत विसर्जन करण्यासाठी निघालेला हा शाही महोत्सव आहे. शृंगारी नवरदेवांच्या मिरवणुका गाजतात. २६ जानेवारीला सत्तापदमण्डित राष्ट्रपतीच्या मिरवणुका निघतात. मग ज्ञानसम्राट परमहंसांच्या मिरवणुका निघाल्या तर त्यावर शंकेच्या शिंका कशाला ? शंकेचे सर्दीपडसे ज्ञानाच्या अमृतांजनाने जाईल कारण तो बाम आहे. राष्ट्रध्वजाची वस्त्र मिरवणुका निघतात. अस्थि कलशाची सुतकी मिरवणुक चालते. स्मरणार्थ काढलेल्या तिकीटावर पोस्ट काळा शिक्का मारते. काळाशिक्का हे काय स्मरण आहे की मरण ? प्रपंचासक्तांच्या ह्दयावर ज्ञानवैराग्याचा ठसा उमटविण्यासाठी मिरवणुका ! अशा शाहीस्नाने हे विश्व कधी पावन होईल.