संत जेथे जातात तेथे तप करतात, ती जागा तीर्थ होत, तारतात ते तीर्थे, तरून जातात ते संत!! चंदनाप्रमाणे झिजणे हे तप आहे. संत तुलसीदासांच्या तपचंदनाने रघुवीरांनी कपाळी तिलक लावला. तपश्चंदनाचा तिलक कपाळी असला तर ललाटरेषा बदलता येते. गौतमांनी तपश्चंदनाने ललाटी लिहिलेले गोहत्येचे पातक धुतले. गौतमांच्या अध्मर्षाने कुशावर्त तीर्थ झाले. कुशावर्तात एकेका जलबिंदूत अनंत पुण्यसिंधू आहेत. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सप्तसरिता कुशावर्तात आपले अधमर्षण करतात. वरील विवेचनाचा सूत्रधारक श्लोक -
प्रभावादभुतादभुमे सलिलस्य च तेजस: ।
परिग्रहान्मुनीनां च तीर्थानां तीर्थता मता ।।
तीर्थे, पर्वे, पर्वण्या व स्नाने हे पावित्र्याचे चौक आहेत. नद्या विराट पुरूषाच्या नाडया आहेत. या नाडयातून पाणी वाहते. त्या पाण्यात फुललेली कमळतीर्थे आहेत. गोदावरी ज्या ब्रम्हगिरीतून प्रकट झाली, त्या ब्रम्हगिरीच्या सावलीत विसावलेले क्षेत्र त्र्यंबकेश्वर आहे. कृतयुग म्हणजे सत्ययुग, जेथे सत्याचीच सत्ता असते. त्या सत्ययुगात झालेले मूळगंगेचे प्रथमावतरण जेथे झाले ते तीर्थराज कुशावर्त !
मनातल्या षडरीपूंचे प्रक्षालन करणारा हा तीर्थसम्राट विश्वाचे पाप धूत आहे. याचे पाणी ब्रम्हद्रव आहे. या त्रिवेणीच्या गुप्त प्रवाहाच्या धारा आहेत. सिंहस्थात याप्रवाहांच्या सरस्वती या त्रिवेणीच्या गुप्त प्रवाहाच्या धारा आहेत. सिंहस्थात या प्रवाहाच्या धारेत सर्व नद्यांचा पुण्य विद्युत प्रवाह खेळतो. या विजेच्या शॉकट्रीटमेंटने शेकडो पापे जळून जातात. ही पुण्यविद्युत पकडण्याचा पवित्र पर्वकाल म्हणजे 'सिंहस्थ पर्वकाल' सिंहासनावर सिंहराशीत बृहस्पती असतात. बृहस्पती देवगुरू, देवांचे पुरोहित, ज्ञानशक्तीने त्रैलोक्याचे हित करणारे हे त्रैलोक्याचे उपाध्याय! या ज्ञानसिंहाचे स्वागत करण्यासाठी सर्व विश्व येथे धावत येते. सूर्यचंद्रही छत्रचामरे धरून या ज्ञानगंगेच्या स्नानाचे कौतुक करतात. चंद्र, सूर्यात एकरूप होतो ती अमावास्या, मनश्चंद्राचे आत्मसूर्यात हरवून जाणे म्हणजे मौक्ष. जीवशिवांचे अद्वैताची जाणीव करून देणारी अमावास्या ही मुख्य पर्वणी! ज्ञानतीर्थावरचे उपाद्याय देवगुरू बृहस्पती सर्व देवांसह, देवतांसह पुण्याच्या राशी उधळीत या पर्वकाळात त्र्यंबकेश्वरी हजर असतात. विश्वाचा आत्मा विश्वसक्षू सुर्य, विराटविश्वाचे मन चंद्र व विराटविश्वाची ज्ञानदेवता बृहस्पती यांचे एका राशीत येणे म्हणजे सूर्यचंद्राचे देवगुरुंच्या राशीतले उपनयनच आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे व मनाचा स्वामी चंद्र आहे. हे दोघे देवगुरुंसह सिंह राशीत येतात. सिंह व सूर्य यांना राशीवाचून विश्वावर राज्य करता येते. राशी म्हणजे ढीग, कळप, टोळी, पदसिध्द साम्राज्य सिंहाचे म्हणून सिंह राशीजवळ आलेल्या सूर्यचंद्राचे 'पर्वणी' म्हणून स्वागत होते. रवि-चंद्र मित्र. ज्ञानगुरू बृहस्पतीचे स्वामी सूर्य, व सूर्याचा प्रकाशशिष्य चंद्र हे सिंह राशीला सिंहाचे बल देतात असे हे बलवान सूर्यचंद्रगुरू स्नानासाठी मूळगंगेच्या धारेवर येतात. येथेच या पुण्य धाराधरांची धार जेथे पडते ते कुशावर्त तीर्थ। महर्षि न्यायदर्शनकार गौतमाची गोहत्या जेथे पूर्णविराम पावली ते हे कुशावर्त तीर्थ !
निवृत्तीनाथांनी ज्या गंगासागरात समाधी घेतली त्या निवृत्तीनाथांना येथील ब्रम्हगिरीच्या गहनगुफेत गहिनिनाथांचे दर्शन झाले. गहिनीनाथ, निवृत्तीनाथ व ज्ञाननाथांच्या त्रिपथगेत महाराष्ट्राने स्नान केले. या कर्म-भक्ति-ज्ञानाच्या आकाशगंगेत स्नान करून संतसाहित्य सुखवले. ताजे टवटवीत झाले अशा ह्या नाथत्रयीला पावन करणारे त्रिसंध्या क्षेत्र त्र्यंबकेश्वर आहे. नवनाथांनी नवयोगेश्वरांची याच त्रिसंध्याक्षेत्रात योगसाधना करून समाधिसुख अनुभवले.
भागीरथी व गोदावरी तत्वत: एकच ।
माहेश्वर जटास्था या आपो दैव्यो महामते ।
तासांतु द्विविधो भेद: आहर्तु: पदकारणात् ।।
धूर्जटीच्या जटाजटांतून दोन जलप्रवाह भूतलावर आले.
महर्षि गौतमांनी कृतयुगात एक प्रवाह भूतलावर आणला व राजर्षि भगीरथांनी दुसरा प्रवाह त्रेतालयुगात भूतलावर आणला.
ब्रम्हवर्चसाचा आल्हादक चंद्र गौतम ।
कृतयुगात त्या तपाचे चांदणे विश्वात पडले होते.
क्षात्रधर्मावा विश्वपालक मेघ, भगीरथ । कपिल, तापदग्ध सांगराच्या उद्धारार्थ भगीरथांनी तप केले व जान्हवीचा प्रवाह भूतलावर आला.
ब्रम्हतपाचा शांत व संथ शीतल प्रवाह गौतम।
क्षात्रतेजाचे धर्मरक्षक कवच भगीरथ!!
विश्वोद्धारासाठी ब्राम्हतेज व क्षात्रतेज एकवटले.
निष्पाप तप प्रधान सत्ययुगाने आम्हाला गोदावरी दिली.
यज्ञप्रधान त्रेतायुगाने आम्हाला भागीरथी दिली.
वडील बहीण वृध्दगोदा ब्रम्हगिरीतून प्रकटली.
धाकटी बहीण भागीरथी हिमालयातून उतरली.
मूळ प्रवाह एक परंतु तो प्रवाह खाली आणणारे दोघे !!
गौतम व भगीरथ
ब्रम्हद्रवरुपा गोदावरी धर्मद्रवरूपा भागीरथी.
पापतापतप्त विश्व बघून धर्म द्रवला ब्रम्हही द्रवले आणि त्यांच्या द्रवीभूत ह्दयाने गंगेचा वेष घेतला.
याचे उत्तर भगवान शिवच देतील !
दोघीही शंकराच्या मस्तकावरच्या !
दोघीही पतीतोद्वारसाठी खाली उतरल्या !!
एक वयाने मोठी म्हणून ती वृध्दगोदा.
ही गोदा शंकराच्या जटेतून निघाली व दत्तवृक्ष औंदुबराच्या मुळात शिरली व गोमुखातून बाहेर पडली. औंदुंबर, वड व पिंपळ हे ब्राम्हणवृक्ष आहेत. गाय वेदमाता आहे आणि गंगा विश्वमाता आहे. निष्पाप कृतयुगात पतित कुणीच नाही. तेव्हा विश्वोद्वारासाठी गोदेने, त्रेतायुगांत गंगेचा वेष घेतला. दोघी एकच पण भक्तभाव भेदाने एकाच जलब्रम्हाने दोन प्रवाह वेष घेतले. कुंभ राशीला गुरू असला की गोदावरी गंगेला भेटण्यासाठी प्रयागला जाते. सिंहेला गुरू आला की भागीरथी गोदावरीला भेटण्यासाठी कुशावर्तात येते. सर्व तीर्थे, सर्व सरिता, सर्व देवता सिंहस्थात गोदास्नान करून भगवान त्र्यंबंकराजांची पूजा करतात. प्रेयसी पार्वतीला फसवून श्रेयसी गंगा मस्तकावर घेतली तीच शिवानी विश्वोद्धारासाठी जगाला दिली. ही गंगा नव्हे हा आशुतोष शिवाचा ह्दयद्रव आहे. गोदावरी ब्रम्हगिरीचा पाझर आहे तर वैतरणा ही ब्रम्हगिरीचा निर्झर आहे. मुंबईची तहान भागविणारी वैतरणा पुढे अलकनंदेप्रमाणे गंगेला भेटते. मौक्ष वितरण करणारी वैतरणा ही ब्रम्हगिरीब्रम्हगिरीतूनच निघाली. गायत्री, गोमाता व गीता ही गंगेचीच रूपे आहेत. वृध्दगोदेची धाकटी बहिण गंगा निवृत्तीनाथांचा ज्ञाननाथांचा उद्धार गोदावरीने केला. त्या गंगेच्या लहरींनी जगन्नाथ पंडित उद्धारले. जगन्नाथांच्या गंगालहरीत गोदेने प्रवेश केला व जगन्नाथांच्या कवितेला परतत्त्व स्पर्श झाला. गोदास्पर्शाने गंगालहरीत रस उधळला व गंगा - गोदा एकरस झाल्या. दोघी एकमेकींना भेटल्या, त्यांनी गंगालहरीत बुडी मारली. रसब्रम्ह काव्यरूप झाले, म्हणून जगन्नाथांनी निराळी गोदालहरीत बुडी मारली. म्हणून जगन्नाथांनी निराळी गोदालहरी लिहिली नाही. गोदावरीच्या मुळाशी गोदेचे प्रिय वल्लभ भगवान त्र्यंबकराज आहेत, म्हणून तळाचा मुळाचा मागोवा घेणारे मूलगामी संत मंहत मुळरांगेत स्नानासाठी येतात.